Tuesday, October 5, 2010

तो... भाग (१)

          तो.. साधारण पंचविशीचा तरूण.. मला प्रथम भेटला तेंव्हा काही विशेष वाटलं नाही त्याच्यात.. म्हणजे पर्सनॅलिटी छान, पण चेहर्‍यावर शांत भाव. त्याचे कपडे नीटनेटके होतेच पण ईतरांपेक्षा काहीसे हटके.. "वेलकम सर..." मला पाहून त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. "थँक्यु" म्हणत मी मंदस्मित केले व त्याच्या पुढे आलेल्या हातात हात मिळवला. ईथेच हा माणूस वेगळाच असणार याची कुणकूण लागली थोडीशी.. हस्तांदोलनातच कळते कि समोरच्याचा आत्मविश्वास किती आहे अन मला त्याच्या हस्तांदोलनात ते कळालेच.. त्याने मला साईट ऑफीसमधल्या त्याच्या टेबलाजवळ नेले. "प्लीज सर", त्याने मला कुठे बसायचे हे खुणेनेच सांगितले. मी बसलो. प्राथमिक ओळख करून घेतल्यावर मी त्याला विचारले, "अगोदर कुठल्या प्रोजेक्टवर होतास ?" "ट्रँटर ईंडीया, सणसवाडी.. सिंपल होता प्रोजेक्ट. ईंटर्नल रोड, लोडींग-अनलोडींग प्लॅटफॉर्म अन जुन्या रूफ शीट्स बदलायच्या होत्या फक्त.. बाकी काही विशेष नव्हते." "हम्म.." मी जरावेळ पॉज घेतला, "काय तुमची कंपनी, ईतका अवघड जॉब आहे तर तुझ्या जोडीला कुणीतरी सिनीयर असायला हवा होता." "सर मी सगळी ड्रॉईंग्ज पाहीली आहेत. जॉब अवघड आहे खरा, पण थोडे काळजीपूर्वक केले तर जमून जाईल सर.. अन तुम्ही आहातच ना मार्गदर्शन करायला. अक्चुअली मी साईटवर लाईन आउटही केलयं, पाहायचं का?" त्याच्या शेवटच्या वाक्याने मी चमकलोच. हा पोरगा काल ईथे आला अन ईतक्यात लाईन आउटही तयार ? "काय केलस तू? मला अगोदर रीपोर्ट करता नाही आला ? पुढे काही केलं नाही ना ?" काहीतरी गडबड झालीच असणार असे वाटल्यामुळे मी त्याच्यावर जवळ्-जवळ ओरडलोच. "हॅलो सर.. एक मिनीट, यू कॅन नॉट टॉक विथ मी लाईक धिस.. मी फक्त लाईन आउट केलय अन तुमचे क्लॅरीफिकेशन मिळावं म्हणूनच पुढे काही केले नाहीये.. आपण प्लीज साईटवर जाऊन बघू, चला.." माझी वाटही न बघता तो साईटवर गेलासुद्धा...



          हायटेम्प फर्नेसेस, चाकण..प्रेस मशिन फाऊंडेशन करायचं होतं साईटवर.. हे काही साधंसुध फाऊंडेशन नव्हते.. २३ मी. बाय १४ मी.. ८ मी खोल..त्यातही 'अतिलिष्ट' असे छोटे छोटे स्ट्रक्चर्स.. डिझाईन बेल्जियमवरून आलेले.. मशिनही तिकडूनच येणार होती.. एरर मार्जिन २ मिमी फक्त ! या फाऊंडेशनवर बसणारं प्रेस मशिन आशियातील सर्वात मोठं व जगातील २ रे मोठे असणार होते (त्यावेळचे).. त्या फाऊंडेशनचं नुसतं ड्रॉईंग जरी पाहिलं तरी माझ्या डोक्यात मुंग्या यायच्या अन या पोरानं चक्क एक दिवसात लाईन आउट केलसुद्धा ! मी साईटकडे चालता चालता विचार करीत होतो.. मग त्याचवेळेस आमच्या सरांचा फोन आला, "समीर, काय हालहवाल साईटवर ? कॉन्ट्रॅक्टरचा ईंजिनीयर आलाय म्हणे, त्याला भेटलास? " "होय सर, भेटलो त्याला... काल आलाय अन पठ्ठ्याने लाईन आउट केलं सुद्धा.. मला तरी काहीतरी गडबड वाटतेय. आता तेच बघायला चाललोय." "हम्म.. बघ जाऊन अन मला सांग काय ते." नेहमीच्या थंडपणे सर बोलले अन फोन कट झाला.. मी साईटवर आलो. तिथे तो व त्याचे ज्युनियर टेप, थिओडोलाईट, ऑटो लेव्हल ई साहित्य घेऊन तयारच होते....

(क्रमशः.. )